Sunday, July 26, 2026
HomePoliticalमी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही,मंत्री हसन मुश्रीफ यांची स्पष्टोक्ती

कागल, दि. २६:
आजच्या एका वर्तमानपत्रांमध्ये मी गोकुळ दूध संघाची निवडणूक लढवून गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष होणार, अशी बातमी आलेली आहे. परंतु; मी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार नाही, अशी स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत आयोजित कागल विधानसभा मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किट वाटप, शिष्यवृत्ती मंजुरी पत्रे वाटप, घरकुल मंजुरीपत्रे वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते. शाहू समूहाचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थित होती.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, बांधकाम कामगार समितीने बांधकाम कामगारांचे नूतनीकरण दरवर्षी होईल यासाठी सजग राहिले पाहिजे. आपण वर्षाला नूतनीकरण केले नाही तर त्याचा लाभ मिळत नाही. नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी त्यांच्या मोबाईलवर कसा मेसेज जाईल, त्याला कसा समजेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच समितीचे काम शंभर टक्के यशस्वी होईल. आम्हा सर्वांचीच अपेक्षा असते की, सर्व लाभ घेऊन बांधकाम कामगारांचे राहणीमान, जीवनमान उंचावले पाहिजे. त्यांची मुले दर्जेदार व गुणवत्त शिक्षण घेऊन डॉक्टर्स, इंजिनियर्स, आयएएस, आयपीएस बनली पाहिजेत.

ते पुढे म्हणाले, बांधकाम कामगार विभागाच्या काही योजनांना कामगार संघटनांचा विरोध आहे, त्याचा अभ्यास करू. त्या पूर्ववत कशा सुरू राहतील, यासाठी मी आणि समरजीतसिंह घाटगे मिळून प्रयत्न करू.

शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, संजय गांधी निराधार योजना समिती व बांधकाम कामगार समिती या योजनांचे लाभार्थी करण्यामध्ये कागल तालुका जिल्हासह राज्यात आघाडीवर आहे. यामध्ये मंत्री श्री. मुश्रीफसाहेबांचे सहकार्य मोठे आहे. आम्हाला जेव्हापासून ही योजना समजली, आम्हीही मोठ्या प्रमाणामध्ये ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम केलेलं आहे. संजयबाबांनीही काम केलेलं आहे आणि महायुतीच्या माध्यमातून ही सगळी कामं चालू आहेत. आज शैक्षणिक सहाय्य योजनेमध्ये २०७३, सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत ५७ , आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत नऊ आणि आरोग्यविषयक २५, असे एकूण २१६४ लाभार्थ्यांना तीन कोटी, ६५ लाख, ७९ हजारांचे आज वाटप आज होत आहे. श्री. घाटगे म्हणाले, बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचे सात हजार प्रस्ताव प्रलंबित आहेत. या प्रश्नी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ व आपण मिळून काम करूया. तसेच; केडीसीसी बँक व राजे विक्रमसिंह घाटगे कागल सहकारी बँकेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज सुविधा देण्यासाठीही प्रयत्नशील राहूया.

श्री. घाटगे म्हणाले, मंत्री श्री.मुश्रीफ, माजी आमदार श्री. घाटगे व मी, आम्ही महायुती म्हणून काम करीत आहोत. आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. प्रत्येक घटकाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचवायचं काम आज आपलं सरकार करीत आहे. कर्जमाफी असेल, वीजबिल माफी असेल, दारिद्र्यरेषेखालील जनतेला धान्याचा विषय असेल, आयुष्मान कार्डच्या माध्यमातून आरोग्याचा विषय असेल, लाडक्या बहिणींचा विषय असेल, शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान निधीचा विषय असेल. समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचायचं काम करीत आहोत.
स्वागत प्रविण काळबर यांनी केले. प्रास्ताविक कामगार उपायुक्त संतोष अहिरे यांनी केले. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील उपसभापती इंद्रजित पाटील, बाजार समितीचे सभापती नाना कांबळे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळे, कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण पंचायत समिती सदस्या सौ. रूपाली आंगज, सुवर्णा जाधव, तेजस्विनी भोरे, पंचायत समिती सदस्य दीपक आंगज, दत्तात्रय दंडवते, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, विस्तार अधिकारी ,श्रीमती सुरेखा शिफूरकर संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश गाडेकर, अस्लम मुजावर, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, उमेश सावंत, सुशांत कालेकर, अर्जुन नाईक, आनंदा पसारे, नवाज मुश्रीफ, युवराज पाटील, रणजित कांबळे, कुमार पिष्टे, बंडा बारड, बांधकाम कामगार समितीचे अध्यक्ष अशोक वडर, संतोष गायकवाड व सर्व कमिटी आदीप्रमुख उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular