Saturday, August 15, 2026
HomeSocialतरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा

तरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे, मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा

कागल, दि. २:
तरुणाई ही सळसळत्या रक्ताची असते. तरुणाईने पेटून उठण्याची गरज आहे. इतिहास घडवायचा असेल तर तरुणाच लागतात, त्याशिवाय कुठल्याही देशाचा इतिहासच घडू शकत नाही. तरूणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे, असे आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, अण्णाभाऊ अवघ्या दीड दिवसांच्या वर शाळेतच गेले नाहीत. अण्णाभाऊंनी मुंबईतील दुकानांच्या पाट्या वाचत- वाचत अक्षर ओळख करून घेतली. ते महान सत्यशोधक साहित्यरत्न होते. ते कम्युनिस्ट विचारांचे होते. त्यांचे कार्य चळवळीचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते गुरु मानत होते. गरिबांबद्दल, दलितांबद्दल त्यांना प्रचंड कळवळा होता.

*दीड दिवसांची शाळा आणि विपुल साहित्यसंपदा……!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वडील गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या चाळीत राहणारे अण्णाभाऊ अवघे दीड दिवसच शाळेत गेले. तरीसुद्धा त्यांनी किती मोठे पोवाडे, किती मोठ्या कादंबऱ्या, पटकथा, लघुकथा अशी विपुल साहित्यसंपदा लिहिली. त्यांनी साहित्यातही एक आदर्श निर्माण केला. ब्रिटिश राजवटीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी फार मोठे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला.

व्यासपीठावर केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, नगरसेवक उमेश सावंत, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील, राजे विक्रमसिंह घाटगे कागल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक राजू जाधव, रणजीत पाटील, विजय काळे, सतीश सोनुले, पाॅल सोनुले, शहाजी सोनुले, आनंदा हेगडे, राहुल कारंडे, संतोष सोनुले, अमर सोनुले, पंकज घुले, महादेव सोनुले, बाळासाहेब हेगडे, विजय सोनुले, रोमाण्णा सोनुले, विशाल आवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्री विजय काळे यांचे अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर व्याख्यान झाले. तसेच; केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयासाहेब माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांनी मनोगते व्यक्त केली.

स्वागत अरविंद कारंडे यांनी केले. प्रास्ताविक रोम्माना सोनुले यांनी केले. आभार संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सौरभ पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular