कोल्हापूर : बिझनेस लोन करून देण्याच्या बहाण्याने घेतलेले ६५ हजार रुपये परत न केल्याच्या वादातून प्रकाश जयवंत दळवी उर्फ पप्पू (वय ४५, रा. प्लॉट नं. ७१, सासनेनगर, आयटीआय हॉस्टेलमागे, कोल्हापूर) यांचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना करवीर पोलीस ठाण्याच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १४०(१) व २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दि. ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.०६ वाजता दाखल करण्यात आला होता. तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ याने बिझनेस लोनच्या प्रक्रियेसाठी प्रकाश दळवी यांनी वेळोवेळी घेतलेले ६५ हजार रुपये परत न केल्याच्या कारणावरून हा कट रचल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ व २ यांनी प्रकाश दळवी यांना जरगनगर येथील शिश बार परिसरातून मारहाण केली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने ॲक्सेस मोपेडवर बसवून कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील पुईखडी येथील मोकळ्या मैदानात, निसर्ग लॉजसमोरील परिसरात नेण्यात आले. तेथे हाताने तसेच पायातील कोल्हापुरी चप्पल (पायताण) वापरून त्यांच्या डोक्यावर, कानावर, चेहऱ्यावर, हात-पायांवर व पाठीवर मारहाण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.
त्यानंतर आरोपी क्रमांक ३ ते ५ यांनी आरोपी क्रमांक १ च्या सांगण्यावरून प्रकाश दळवी यांना शिरोली दुमाला गावातील पठार नावाच्या शेतातील खोपीत डांबून ठेवल्याचा आरोप आहे. तसेच गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल (एमएच-०९-बीई-२३९०) शिश बार परिसरातून आणून बेले, ता. करवीर येथील मेस्त्रीच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आली. मयताच्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून ते मोडण्यात आले, तर मोबाईल हॅण्डसेट नदीत फेकून दिल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात यापूर्वी करवीर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ६७/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली होती. मयताच्या चौकशीत खुनाचा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर सरकारतर्फे फिर्यादी होऊन आरोपी क्रमांक १ ते ५ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली कोल्हापुरी चप्पल (पायताण) तसेच आरोपींच्या वाहनांपैकी ॲक्सेस मोपेड (एमएच-०९-ईडी-०११०), हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच-०९-सीक्यू-७६७४), सीडी डिलक्स मोटरसायकल (एमएच-०९-बीडी-९११३), मयताची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल आणि आरोपींच्या अंगावरील कपडे असा मुद्देमाल तपासात जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अजिंक्य शिवाजी शहापुरे (वय ३२, रा. धन्वंतरी कॉलनी, आर. के. नगर, मोरेवाडी, कोल्हापूर) हा सुमारे एक वर्षापासून फरार होता. तो माननीय न्यायालयासमोर शरण आल्यानंतर दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दि. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, राहुल देसाई, रणजीत पाटील, अविनाश कांबळे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार या तपासात सहभागी आहेत.