Friday, August 14, 2026
HomePoliticalखुपिरेच्या बलभीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते...

खुपिरेच्या बलभीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

दोनवडे, ता. १४ : खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेमध्ये सन २०१७ मध्ये कोट्यवधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी संबंधित शासकीय कार्यालयांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, बलभीम विकास सेवा संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार सरकारी लेखापरीक्षक सचिदानंद पैलवान यांनी सन २०१७ मध्ये उघडकीस आणला होता. या प्रकरणी त्यावेळी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र, दोषी संचालकांवर तातडीने कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप सरदार बंगे यांनी केला आहे.

तसेच, एका कर्जदाराने सात लाख रुपयांचे कर्ज भरल्याची पावती उपलब्ध असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. संस्थेचे सचिव, चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक यांनी संबंधित रक्कम व्याजासह सुमारे १४ ते १५ लाख रुपये सन २०२० पासून संस्थेच्या बँक खात्यात जमा केले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या कथित गैरव्यवहारप्रकरणी संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याने सरदार बंगे यांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक तसेच गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी अर्ज सादर केल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, आजपर्यंत कोणत्याही संबंधित कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

त्यामुळे नाईलाजास्तव १५ ऑगस्ट रोजी कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा सरदार बंगे यांनी दिला आहे. या प्रकरणातील कथित भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारे संबंधित शासकीय अधिकारी व संस्थेचे संचालक यांची याबाबत सर्वस्वी जबाबदारी राहील, असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular