पन्हाळा, प्रतिनिधी : पन्हाळगडावरील तब्बल 99 वर्षांची परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वात जुन्या शाळांपैकी एक असलेल्या कुमार विद्यामंदिर, पन्हाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्या हस्ते शाळेला संगणक भेट देण्यात आला.
मुख्याध्यापिका रचना चिले यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी 3 वाजता सर्व पालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी हात वर करून निवड प्रक्रिया पार पडली. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शहाबाज शब्बीर मुजावर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अपर्णा मदन काशीद यांची निवड झाली. समितीचे सचिवपद मुख्याध्यापकांकडे राहणार असून, शिक्षक प्रतिनिधी म्हणून सरदार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदार गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका रमना चिले यांनी मानले.
चार प्रमुख शाळांना संगणक भेट
शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठान आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील चार प्रमुख शाळांना संगणक भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कुमार विद्यामंदिर, पन्हाळा या शाळेचाही समावेश करण्यात आला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, “ही माझी शाळा आहे. त्यामुळे शाळेला लागेल ती मदत करणे हे माझे कर्तव्य आहे.”
शाळेची इमारत जवळपास शंभर वर्षांपूर्वीची असल्याचे सांगत त्यांनी नवीन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना सोबत घेऊन शाळेच्या इमारतीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
“ही शाळा कायमस्वरूपी टिकली पाहिजे आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा बनली पाहिजे, हा आमचा मानस आहे,” असेही भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माजी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुनिता उदाळे, पत्रकार अनुप गवंडी, नगरसेविका रशिदा मुजावर, प्रियांका गळवी, तसेच पालक शरीफ नगारजी, विश्वजीत पाटील यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.