कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सीपीआरच्या ऐतिहासिक मुख्य इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
सकाळी 7.15 वाजता महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. अनिता परितेकर व नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करून देशभक्तीमय वातावरण निर्माण केले.
यानंतर डॉ. सदानंद भिसे यांच्या हस्ते सीपीआरच्या ऐतिहासिक इमारतीतील मुख्य स्तंभाचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 150 फुगे आकाशात सोडण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार कान, नाक व घसा शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे यांच्या हस्ते तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात आली. तसेच अधिसेविका सौ. स्वाती भिवसे यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली.
सीपीआरच्या नुकत्याच झालेल्या नूतनीकरणाचे काम उत्कृष्टरीत्या व वेळेत पूर्ण केल्याबद्दल संबंधित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये स्थापत्य व विद्युत कामांचे कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते तसेच बांधकाम समितीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे म्हणाले की, “स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, सुरक्षितपणे आणि समानतेने जगण्याची संधी मिळणे होय. स्वातंत्र्याची खरी कसोटी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास, आरोग्य, शिक्षण आणि न्याय पोहोचतो की नाही यात आहे.”
वैद्यकीय क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना त्यांनी सीपीआर हे केवळ रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसून कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातील जनतेच्या विश्वासाचे मंदिर असल्याचे नमूद केले. रुग्णसेवेत गुणवत्ता, उत्कृष्टता, माणुसकी, करुणा, संयम व प्रामाणिकपणा यांचा समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. “मी माझ्या कार्याशी प्रामाणिक राहीन, रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देईन, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करीन, माझ्या ज्ञानात सातत्याने भर घालीन आणि माझ्या कार्यातून माझ्या संस्थेचे, कोल्हापूरचे व भारत देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करीन,” अशी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली.
कार्यक्रमास छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, डॉ. अजित लोकरे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप, अधिसेविका सौ. स्वाती भिवसे यांच्यासह महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, एमएसएफचे जवान व अधिकारी, वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक रोहित लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी समाजसेवा अधीक्षक विभागाने उत्कृष्टपणे पार पाडली.