किल्ले पन्हाळा प्रतिनिधी :शहानवाज मुजावर
ऐतिहासिक पन्हाळगडावरील शिवस्मारक व परिसराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने अतिरिक्त १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या १० कोटी रुपयांसह आता एकूण २५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शिवस्मारक परिसराच्या विकासकामांना मोठी चालना मिळणार आहे.
पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील शिवतीर्थ तलाव परिसरातील शिवस्मारकाच्या विकासासाठी नगरविकास विभागाने २१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णय जारी केला. या निधीतून बगीचा, पदपथ आणि विविध अनुषंगिक विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पन्हाळगडाचे ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व अधिक अधोरेखित होणार आहे.
शिवस्मारकाच्या विकासासाठी आमदार चंद्रदीप नरके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विधानसभेतही त्यांनी भरीव निधीची मागणी केली होती. यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ मार्च २०२५ रोजी शिवस्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता त्यात आणखी १५ कोटींची भर पडली आहे.
आमदार नरके यांनी पन्हाळगड हा लाखो शिवभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याचे सांगत, शिवस्मारकाचा विकास हा शिवरायांच्या इतिहासाचा सन्मान असल्याचे नमूद केले. विकासकामांच्या नियोजनात स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व शिवभक्तांना विश्वासात घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
निधी मंजुरीबद्दल नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने आणि नगरविकास विभागाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.