Tuesday, August 25, 2026
HomeCrimeराजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमधील गर्भलिंग निदान प्रकरणी दोन एजंट अटक

राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमधील गर्भलिंग निदान प्रकरणी दोन एजंट अटक

कोल्हापूर | दि. २५ ऑगस्ट २०२६

बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणात करवीर पोलिसांनी श्री हॉस्पिटल, राजारामपुरी येथील दोन संशयित एजंटांना अटक केली आहे. संध्या नंदकुमार लोंढे (वय ४२, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) आणि संदीप सुरगौंडा पाटील (वय ४०, रा. वसगडे, ता. करवीर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७०/२०२६ नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये बीएनएस कलम ९१, ३१९(२), ३(५) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम, गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र अधिनियम (PCPNDT) आणि वैद्यकीय गर्भपात कायद्यातील संबंधित कलमांचा समावेश आहे.

या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १६ आरोपी निष्पन्न झाले असून, त्यापैकी नऊ आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

पोलिसांच्या तपासात संध्या लोंढे आणि संदीप पाटील हे श्री हॉस्पिटल, राजारामपुरी येथे काम करत असल्याचे तसेच गर्भलिंग निदानासाठी रुग्ण पुरविणे आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकारात त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात सहा. फौजदार राहुल देसाई यांच्यासह पोलीस अंमलदारांचा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular