पन्हाळा, प्रतिनिधी : मौजे तिरपण येथे ऑनलाईन पद्धतीने मुंबई मटका जुगार चालविणाऱ्या एका व्यक्तीवर पन्हाळा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आकडेवारीची बुक, गुगल पे स्कॅनर, सहा मोबाईल फोन व लॅपटॉप असा एकूण १ लाख ६१ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शुभम यशवंत जाधव (वय २९, रा. तिरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास, मौजे तिरपण येथे यशवंत गणपती जाधव यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाच्या पाठीमागील बाजूस आडोशाला शुभम जाधव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मुंबई मटका जुगार चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपी हा लोकांकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारून मटका जुगाराचे अंक घेत होता. तसेच युट्यूबवरील महाकाल चॅनेलच्या माध्यमातून जुगाराशी संबंधित माहितीचा वापर करून व्यवहार करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र राजाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६५/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल ४९४ भोसले यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. नाईक करीत आहेत.