कोल्हापूर : सायबर महाविद्यालयाच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत वारांगना सखी संघटनेच्या सदस्यांसोबत राखी पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. समाजकार्य विभागामार्फत गेली पंधरा वर्षे वारांगनांसोबत राखी पौर्णिमा साजरी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, यंदाही हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी वारांगना सखी संघटनेसोबत साजरी करण्यात येणारी राखी पौर्णिमा आयुष्याला प्रेरणा देणारी असल्याचे सांगितले.
यावेळी वारांगना सखी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती शारदाताई यादव यांनी संघटनेचा आजवरचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तसेच संघटनेसमोर असणारी विविध आव्हाने आणि या घटकाकडे समाजाचा असलेला दृष्टिकोन यावर त्यांनी विवेचन केले. समाजाने या घटकाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना समाजकार्य विभागाचे प्राचार्य डॉ. टी. व्ही. जी. शर्मा यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक दृष्टिकोन बदलण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मोरे यांनी केले, तर जयश्री कुरबेटी यांनी आभार मानले. शिवानी शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले.
या कार्यक्रमास सायबर महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे, डॉ. सुरेश आपटे, प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. संध्या तळेकर, प्रा. शिवानी गावडे, प्रा. वसीम सय्यद, किर्लोस्कर कंपनीचे मोहन तायडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास समाजकार्य विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.