Monday, August 31, 2026
HomePoliticalराष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री...

राष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन


कागल, दि. ३०:
राष्ट्रीय महामार्गावर कागलमध्ये पिलरचा पूल होणे ही आम्हा कागलकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कागलमधून जाणारा हा पिलरचा पुल देशात सर्वात सुंदर पुल बनेल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गावर कागल शहरातून जाणारा हा पुल भरावाच्या बोगद्याच्या पुलाऐवजी पिलरचा उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे मी केली होती. त्यांनी या मागणीला सत्वर मंजुरी दिली आणि तातडीने त्याच्या निविदाही निघाल्या. याबद्दल केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांचे आभारी आहोत, असेही ते म्हणाले.

मुंबई -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलमध्ये होणाऱ्या पिलरच्या उड्डाणपुलाचा पायाभरणी समारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. २९५ कोटी निधीमधून एक किलोमीटर लांबीचा व ५० पिलरचा हा पूल येत्या दीड वर्षात पूर्ण होणार आहे.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, याआधीच्या निर्धारित कंत्राटदारांना साक्षात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी बजावूनसुद्धा ते काम सोडून पळून गेले आहेत. नव्याने काम घेतलेले कंत्राटदार श्री. धारीवाल यांच्या कामाची गती जलद आहे. या पुलाचा संपूर्ण आराखडा कागल शहरात आहे, त्यामुळे या पुलाचे काम पूर्णत्वाला जात असताना शहराच्या नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. युटिलिटी शिफ्टिंगची कामे काळजीपूर्वक व व्यवस्थितपणे पार पाडा. कागल नगरपालिका आणि आम्ही सर्वजणच तुमच्या पाठीशी उभे आहोत. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असतो आणि खराब काम करणाऱ्यांच्या पाठी आम्ही दांडके घेऊन लागतो.
​हा पूल पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी सर्वत्र सांगेल की आम्ही देशात अनेक ठिकाणी कामे केली परंतु; कागलसारखे प्रेम आम्हाला कुठेच मिळाले नाही.

*पिलरच्या पुलाचे फायदे……!*
● वाहतुकीची कोंडी होणार नाही.
●नवीन बस स्थानकासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार नाही.
●महामार्गालगतचे रहिवाशी, हातगाडीवाले, फळविक्रेते, चहा टपरीवाले व छोटे व्यावसायिक विस्थापित होणार नाहीत.
●कर्नाटकातून येणारी वाहने, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतीमधून कागलमधील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक सुरळीत होईल.
●स्थानिक बस वाहतूक, रिक्षा व वडाप ही वाहतूकसुद्धा सुरळीत होईल व अपघात टळतील.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्षा सौ. सविता माने, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, बबलू सागवान, विवेक सोनीजी , संदीप आदी उपस्थित होते.
……………

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular