कोल्हापूर प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पन्हाळा येथील न्यायालयाने राहुल अशोक भोसले (वय ३७, रा. मधली गल्ली, पन्हाळा) याला दोषी ठरवत सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपीला पॉक्सो कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पन्हाळा तालुक्यातील राक्षी ते धबधबेवाडी रस्त्यावर वीटभट्टीजवळ ही घटना घडली होती. शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला आरोपीने अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता.
या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आपल्या आईला दिल्यानंतर पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
या प्रकरणाची सुनावणी न्यायालयासमोर झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अॅड. मंजुषा बी. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने साक्षीदारांचे जबाब, पीडित मुलीची व तिच्या आईची साक्ष तसेच इतर पुरावे ग्राह्य धरून आरोपी राहुल भोसले याला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला पॉक्सो कायद्यानुसार तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांची कैद भोगावी लागणार आहे. तसेच संबंधित भादंवि कलमानुसार एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
दंडाच्या रकमेपैकी काही रक्कम पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासात पन्हाळा पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.