Sunday, September 13, 2026
HomePolitical‘असेल दम तर उलटं टांगून दाखवा’; शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा क्षीरसागरांवर पलटवार

‘असेल दम तर उलटं टांगून दाखवा’; शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा क्षीरसागरांवर पलटवार

कोल्हापूर प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वक्तव्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. “असेल दम तर मला उलटं टांगून दाखवाच,” असे थेट आव्हान देत शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्यावर जोरदार पलटवार केला.

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना ‘चोपून काढू’ असा इशारा राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार टीका केली होती.

“अधिकाऱ्यांना चोपून काढू म्हणणारे राजू शेट्टी राक्षस आहेत का? सरकारने एकदा मनात घेतले, तर तुम्हाला उलटं टांगून ठेवले जाईल,” अशा शब्दांत क्षीरसागर यांनी शेट्टी यांना इशारा दिला होता.

शेट्टींचा दिल्लीहून पलटवार

क्षीरसागर यांच्या या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे माध्यमांशी संवाद साधताना जोरदार पलटवार केला. “असेल दम तर मला उलटं टांगून दाखवाच,” असे आव्हान त्यांनी क्षीरसागर यांना दिले.

यावेळी शेट्टी यांनी क्षीरसागर यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या नादाला लागू नये, असा इशारा देत शेतकऱ्यांचा हिसका त्यांना अद्याप कळलेला नाही, असे शेट्टी म्हणाले.

सांगलीत क्षीरसागरांच्या वक्तव्याचा निषेध

दरम्यान, क्षीरसागर यांच्या इशाऱ्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले. सांगलीत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत क्षीरसागर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आंदोलनादरम्यान क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगून जाळण्यात आल्याची माहिती आहे.

शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आधीच शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामार्गासाठी जमीन अधिग्रहण आणि मोजणीच्या प्रक्रियेला विरोध होत असताना राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे हा मुद्दा आता अधिकच राजकीय बनला आहे.

‘उलटं टांगून ठेवू’ या इशाऱ्याला ‘असेल दम तर टांगून दाखवा’ असे प्रत्युत्तर देत राजू शेट्टी यांनी क्षीरसागरांना थेट आव्हान दिल्याने शक्तिपीठ महामार्गावरील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular