कोल्हापूर, प्रतिनिधी : महापालिकेतील सत्ताधारी महायुतीमधील शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यातील वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत आयुक्तांसमोरच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ करत चौकात ये, बघून घेण्याची भाषा करण्यात आल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. दोघेही अंगावर चाल करून जाण्याच्या तयारीत असताना शर्टाच्या बाह्या सरसावल्याने उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी मध्यस्थी करत त्यांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या घटनेनंतर दोन्ही गटांच्या समर्थकांनी महापालिका परिसरात तसेच प्रवेशद्वारावर गर्दी केल्याने काही काळ मोठा तणाव निर्माण झाला.
महापालिका आयुक्त कार्यालयातील सभागृहात वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. विविध भागांतील धोकादायक झाडे व फांद्या तोडण्यासंदर्भातील विषय बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. बाराऐवजी सुमारे एक वाजता बैठक सुरू झाली. सुरुवातीला प्रशासनाने निम्मे विषय समितीसमोर मांडून त्यास मंजुरी घेतली.
बैठकीत शारंगधर देशमुख हे टेबलाच्या एका बाजूला, तर आदिल फरास दुसऱ्या बाजूला बसले होते. रंकाळा टॉवर परिसरातील तसेच टिंबर मार्केटमधील झाडांसंदर्भातील विषयांवर चर्चा सुरू असताना आदिल फरास यांनी काही प्रश्न उपस्थित केले.
त्यानंतर निर्मिती कॉर्नर रस्त्यावरील झाडांचा विषय चर्चेस आला. त्यावेळी शारंगधर देशमुख यांनी संबंधित विषयाबाबत प्रशासनाकडे माहिती मागितली. यावेळी फरास यांनी, “तुमचे विषय मान्य करून घेता, आमच्या पक्षाच्या नगरसेविकेचे विषय आहेत, तेही मान्य करा,” अशी भूमिका मांडल्याचे सांगण्यात आले. त्यावर देशमुख यांनी यापूर्वीच्या दोन विषयांचा संदर्भ दिल्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच भडकला.
वाद वाढत जाऊन दोघांनी एकमेकांना अर्वाच्च शिवीगाळ केल्याची चर्चा महापालिका परिसरात रंगली. चौकात येऊन बघून घेण्याची भाषा करण्यात आल्याने उपस्थितांमध्येही खळबळ उडाली.
दरम्यान, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव आणि काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी तातडीने मध्यस्थी करत दोन्ही गटनेत्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे वातावरण अधिक चिघळण्यापासून रोखण्यात यश आले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराबाबत शारंगधर देशमुख यांनी “काही झालेच नाही, तर काय सांगू?” असा पवित्रा घेतल्याचे समजते.
महापालिकेतील सत्ताधारी महायुतीतील दोन प्रमुख गटनेत्यांमधील हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत झालेल्या या राड्यामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण तापल्याची चर्चा सुरू आहे.