सांगली प्रतिनिधी:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मंगळवारी सांगलीत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगून त्यानंतर त्याचे दहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात संतापजनक व अपमानास्पद भाषेत टीका केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. राजू शेट्टी यांना ‘राक्षस’ संबोधून उलटे टांगण्याबाबत वक्तव्य केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
राजकीय मतभेद असू शकतात; मात्र व्यक्तीविरोधात धमकीवजा अथवा अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. याच कथित वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संजय बेले, विश्वास कोळी, मनोहर पाटील, अजित लांडे, दीपक फराटे, चंद्रकांत अडसूळ, मयूर पाटील, नटराज पाटील, शरद पाटील, श्रीधर पाटील, अवधूत पाटील, संतोष ढोले, विनोद बेले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू शेट्टींचा अपमान सहन करणार नाही : संदीप राजोबा
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा म्हणाले की, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. अशा नेतृत्वाबाबत अपमानास्पद व धमकीवजा भाषा वापरणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात केलेल्या कथित वक्तव्याबाबत खुलासा करून माफी मागावी, अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राजोबा यांनी यावेळी दिला.