खुपीरे, दि. ८ सप्टेंबर २०२६ : शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या जमीन मोजणीस विरोध करण्यासाठी खुपीरे येथे आज शक्तिपीठ बाधित शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जमीन मोजणीस विरोध करण्यासाठी खुपीरे, साबळेवाडी व शिंदेवाडी परिसरातील बाधित शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
महादेव मंदिर, खुपीरे येथे झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी शक्तिपीठ बाधित शेतकरी संघटनेचे नेते कॅप्टन उत्तम पाटील होते. यावेळी प्रवीण पाटील, पत्रकार ज्योतिराम घोडके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुपीरे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, पांडुरंग शिंदे, अर्जुन पाटील (गवळी), संतराम पाटील (राऊ), कुंडलिक केंबळेकर यांच्यासह बाधित शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवित जमीन मोजणीस सहकार्य न करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या जमिनी व उपजीविकेवर परिणाम करणाऱ्या या प्रकल्पासंदर्भात शासनाने बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका विचारात घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
उद्याच्या जमीन मोजणीच्या पार्श्वभूमीवर हसूर दुमाला येथे खुपीरे, साबळेवाडी, शिंदेवाडी तसेच परिसरातील बाधित शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी एकत्रित उपस्थित राहणार आहेत. खुपीरे ग्रामस्थांच्या वतीने शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सभेस डे. सरपंच युवराज पाटील, सागर पाटील, आनंद पाटील, प्रवीण पाटील, पांडुरंग शिंदे, प्रशांत पाटील, संदीप पाटील, कृष्णात साबळे, ज्ञानदेव पाटील, भगवान पाटील यांच्यासह शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.