Sunday, September 13, 2026
HomePoliticalमराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे पाटलांची अंतरवालीतून मोठी घोषणा

मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे पाटलांची अंतरवालीतून मोठी घोषणा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, अखेर मुंबईतील आंदोलनाची अधिकृत घोषणा केली आहे. मागण्या मान्य न झाल्याने आता मराठा बांधवांचा मोर्चा १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या आंदोलनाचा समारोप मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५वा दिवस आहे. मराठा-कुणबी दाखल्यांबाबत तसेच विविध मागण्यांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता. मात्र, अद्याप या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने त्यांनी मुंबई आंदोलनाचा मार्ग निश्चित केला आहे.

असा असेल मुंबई आंदोलनाचा प्रवास

जरांगे पाटील यांच्या घोषणेनुसार मराठा बांधवांचा मोर्चा १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

  • १५ सप्टेंबर : अंतरवाली सराटी ते पाटोदा (बीड) — पहिला मुक्काम

  • १६ सप्टेंबर : श्रीगोंदा (अहिल्यानगर) — दुसरा मुक्काम

  • १७ सप्टेंबर : हडपसर, पुणे — तिसरा मुक्काम

  • १८ सप्टेंबर : खोपोली (रायगड) — चौथा मुक्काम

  • १९ सप्टेंबर : मुंबईतील आझाद मैदान — उपोषणाला सुरुवात

या नियोजित मार्गामुळे पुढील काही दिवसांत मराठा आंदोलनाची मोठी mobilization पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सरकारपुढे पुन्हा आव्हान

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना आंदोलन मागे घ्यावे लागले होते. आता पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने मोर्चाची घोषणा झाल्याने राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सरकारकडून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे सांगत त्यांनी जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावे, अशी विनंती केली होती. मात्र, अद्याप मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याने जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरूच आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई आंदोलनाकडे

१५ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा मोर्चा कोणत्या स्वरूपात मुंबईत पोहोचतो आणि सरकार या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर प्रस्तावित उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular