पन्हाळा प्रतिनिधी, (शहाबाज मुजावर)
महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथे घरात घुसून चोरी केल्याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सरदार बापू महाडिक (वय ५५, व्यवसाय प्राथमिक शिक्षक, रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला. दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ ते २ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरी चोरीची घटना घडली.
घटनेनंतर पन्हाळा पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूरच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आजूबाजूच्या गावांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबरच स्थानिक पातळीवर माहिती संकलित करून संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात आला. गोपनीय माहिती व संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी नंदकिशोर सदानंद महाडिक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडिक (वय २८), दोघेही रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा, यांना दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.५१ वाजता अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघांनी चोरीची कबुली दिली आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश खोत पुढील तपास करीत आहेत. चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच या गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.