Monday, September 14, 2026
HomeCrimeजबरी चोरीचा २४ तासांत छडा; पन्हाळा पोलिसांची दमदार कामगिरी

जबरी चोरीचा २४ तासांत छडा; पन्हाळा पोलिसांची दमदार कामगिरी

पन्हाळा, दि. १४ सप्टेंबर २०२६ : पन्हाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून वृद्ध महिलेचे हात व तोंड कापडाने बांधून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटणाऱ्या दोन आरोपींना पन्हाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

नंदकिशोर सदानंद महाडीक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडीक (वय २८), दोघे रा. महाडीकवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी सरदार बापू महाडीक यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर घरातील वृद्ध महिलेचे हात व तोंड पांढऱ्या कापडाने बांधून तिच्या हातातील सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने ओढून काढल्या. यावेळी महिलेच्या मनगटाजवळ व तोंडाजवळ दुखापत झाली. आरोपींनी तिच्या अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या आणि बुगडी, असे एकूण पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी स्वतंत्र तपास पथकाची नियुक्ती केली.

तपास पथकाने घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, संशयित व्यक्ती किंवा वाहन स्पष्टपणे आढळून आले नाही. त्यामुळे हा गुन्हा स्थानिक व्यक्तीने केला असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेण्यात आली.

तपासादरम्यान नंदकिशोर महाडीक हा कर्जबाजारी असून त्याला पैशांची गरज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता दि. ७ सप्टेंबर रोजी त्याने एका कापड दुकानातून कापड खरेदी करून फोन-पेच्या माध्यमातून पैसे दिल्याचे आढळून आले.

पोलिसांनी संबंधित कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नंदकिशोरने खरेदी केलेले कापड आणि घटनास्थळी वृद्ध महिलेला बांधण्यात आलेले तसेच उर्वरित मिळून आलेले कापड यामध्ये साम्य असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज त्याला दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आपण आणि आपला मित्र रमेश महाडीक यांनी मिळून हा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले.

यानंतर पोलिसांनी रमेश सदाशिव महाडीक याला तात्काळ ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे सोन्याचे पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या आणि बुगडी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सलीम सनदी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश खोत, सफौ समीर मुल्ला, पोहेकॉ तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, पोना सचिन पाटील, पोलीस अंमलदार प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले आणि अमर चव्हाण यांच्या पथकाने केली.

अवघ्या २४ तासांत गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीचा छडा लावत पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पन्हाळा पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular