प्रतिनिधी : सावकारकीच्या व्याजाच्या नावाखाली १० टक्के व्याज आकारून, दंडव्याज व खंडणीच्या नावाखाली तब्बल २ कोटी ५२ लाख ५४ हजार ९२२ रुपये उकळल्याचा आरोप करत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जिवे मारण्याच्या धमक्या, सोन्याचे दागिने, चेक व एटीएम कार्डचा गैरवापर केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. गीता स्वप्नील मोरे (वय ३२, व्यवसाय बॅटरी सर्व्हिसेस व साड्या विक्री, रा. सोनाळी, ता. करवीर; सध्या फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुन्हा रजि. नं. ४८७/२०२६ असून भारतीय न्याय संहिता कलम ३०८(५), ३०९(३), ३१८(४), ३५१(२)(३) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम ३९, ४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, २० सप्टेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत घरगुती अडचणींसाठी आरोपी क्रमांक १ सिद्धेश मिलिंद गायकवाड याच्याकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आले. त्यावर १० टक्के व्याज आकारण्यात आले. त्यानंतर बॅटरी डिलरशीप व कपड्यांच्या व्यवसायासाठी सहा लाख रुपये देऊन, रक्कम परत करण्यास उशीर झाल्यास दंडव्याज आकारले जाईल आणि एका महिन्यात १२ लाख रुपये परत करावे लागतील, असे सांगितल्याचा आरोप आहे.
तसेच, फिर्यादीकडून पैसे घेऊन तेच पैसे पुन्हा तिच्या व पतीच्या बँक खात्यावर पाठवून त्यावर पुन्हा १० टक्के व्याज आकारले जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींकडून विविध व्यक्ती व कथित टोळींची नावे घेत फिर्यादी आणि तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादीने तिचे व कुटुंबातील सदस्यांचे मिळून १८६.६१ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवून ११ लाख रुपये घेतल्याचे नमूद केले आहे. हे पैसे आरोपीला दिल्यानंतर आरोपीने संबंधित सोनाराकडून दागिने परस्पर सोडवून घेतल्याचा आरोप आहे.
याशिवाय, स्टँपवर नोटरी करून घेणे, सोन्याचे दागिने, चेक व एटीएम कार्डचा वापर करणे, परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढणे तसेच भीती दाखवून खंडणीच्या स्वरूपात रक्कम उकळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, व्याज व खंडणीच्या नावाखाली आतापर्यंत २ कोटी ५२ लाख ५४ हजार ९२२ रुपये घेत तिची आर्थिक लुबाडणूक करण्यात आली. या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.