Sunday, October 4, 2026
HomeEducationमहात्मा गांधी जयंती निमित्त सामानगडावर सायबर महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम

महात्मा गांधी जयंती निमित्त सामानगडावर सायबर महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम

कोल्हापूर प्रतिनिधी : महात्मा गांधी जयंतीनिमित्त सायबर महाविद्यालयाच्या समाजकार्य, व्यवस्थापन आणि कॉम्प्युटर विभागाच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज तालुक्यातील ऐतिहासिक सामानगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गड परिसराची स्वच्छता केली.

मोहिमेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. दीपक भोसले यांनी महात्मा गांधींचे विचार दिशादर्शक असून, हे विचार प्रत्यक्ष कृतीत आणल्यास समाजात परिवर्तन घडू शकते, असे प्रतिपादन केले.

सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांनी उपस्थितांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा देत ऐतिहासिक सामानगडाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे आवाहन केले. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती सामाजिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन प्रा. महंतेश पाटील यांनी केले. प्रशासकीय अधिकारी डॉ. विनायक साळोखे यांनी आभार मानले. दिवसभर चाललेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रा. सचिन जगताप यांनी बासरीवर महात्मा गांधींची भजने सादर करून वातावरणात विशेष रंग भरला.

यावेळी प्रा. डी. एस. माळी, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. मधुरा माने, डॉ. रजनी कामत, श्री. विकास पाटील यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमास सायबर महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे आणि सचिव सीए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular