Sunday, October 4, 2026
HomePolitical‘गोकुळ’च्या जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; मुश्रीफांच्या नाराजीने पेच वाढला

‘गोकुळ’च्या जागावाटपावरून महायुतीत धुसफूस; मुश्रीफांच्या नाराजीने पेच वाढला

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा पुन्हा चिघळला आहे. जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नाराजीमुळे अधिकृत घोषणा रखडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीतील महायुतीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील घटक पक्षांमध्ये गोकुळच्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. अखेर ठरावधारकांच्या संख्याबळाचा आधार घेत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फॉर्म्युल्याला मुख्यमंत्री स्तरावरूनही हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्ष घोषणा करण्याच्या टप्प्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नाराजीमुळे अडथळा निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा, भाजपला सात, शिवसेना शिंदे गटाला सात आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन जागा देण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीच्या नऊ जागांमध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या गटाच्या एका जागेचाही समावेश असल्याची माहिती आहे.

मात्र, राष्ट्रवादीकडे तसेच यड्रावकर गटाकडे असलेल्या ठरावधारकांच्या संख्येच्या तुलनेत मिळणाऱ्या जागा कमी असल्याचा मुश्रीफ यांचा आक्षेप असल्याचे समजते. मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसाठी दहा जागांची मागणी केली होती. प्रत्यक्षात नऊ जागांवर तडजोड करण्याचा प्रस्ताव आल्याने ते समाधानी नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘बाहेरून पाठिंबा’च्या भूमिकेने खळबळ

जागावाटपावर नाराज असलेल्या मुश्रीफ यांनी महायुतीच्या पॅनलला थेट साथ देण्याऐवजी बाहेरून पाठिंबा देण्याचा निरोप दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. मुश्रीफ यांची भूमिका आगामी दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुश्रीफ यांच्या नाराजीची दखल मुख्यमंत्री स्तरावरही घेतली गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फॉर्म्युला जवळपास निश्चित असतानाही त्याची अधिकृत घोषणा करण्यास विलंब होत आहे. यापूर्वी झालेल्या दोन बैठकींमध्येही जागावाटपाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा घोषणा लांबणीवर पडल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत.

संख्याबळ विरुद्ध पक्षीय वाटपाचा पेच

गोकुळच्या निवडणुकीत जागावाटप करताना ठरावधारकांचे संख्याबळ, प्रत्येक पक्षाचा प्रभाव आणि स्थानिक राजकीय समीकरणे यांचा विचार करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्ष जागावाटपात पक्षनिहाय कोटा निश्चित झाल्याने काही गटांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः राष्ट्रवादी आणि यड्रावकर गटाकडे तुलनेने अधिक ठरावधारक असतानाही त्यांच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी जागा येत असल्याचा मुद्दा मुश्रीफ यांनी उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळे केवळ एका जागेचा प्रश्न नसून भविष्यातील गोकुळमधील राजकीय प्रभावाचा हा विषय असल्याची चर्चा आहे.

महायुतीसमोर नवा पेच

गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. मात्र, जागावाटपावरच घटक पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या रणनीतीवर होण्याची शक्यता आहे.

एकीकडे महायुतीचा पॅनल निश्चित करण्याच्या हालचाली सुरू असताना दुसरीकडे मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मुश्रीफ यांनी अखेरच्या क्षणी तडजोड स्वीकारली तर महायुतीचा फॉर्म्युला मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यास गोकुळच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसू शकतो.

त्यामुळे ‘गोकुळ’च्या जागावाटपाची अधिकृत घोषणा कधी होणार आणि मुश्रीफांची अंतिम भूमिका काय असणार, याकडे आता कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular