कोल्हापूर –
दैनिक तरुण भारत संवाद कोल्हापूरचे सांगरूळचे ग्रामीण बातमीदार गजानन दिनकर लव्हटे यांना महाराष्ट्र कुस्ती संघटनेचा उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार २०२६ देऊन गौरवण्यात आले आहे .
कोल्हापूरच्या शाहू संस्कृतीक सभागृहात महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या वतीने कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वस्ताद निवेदक पत्रकार युवा कुस्तीगीर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . पॅरा ऑलम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या अध्यक्षतेखाली व हिंदकेसरी दीनानाथ सिंह महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पैलवान संग्राम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच हा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी दैनिक तरुण भारतचे सांगरूळचे बातमीदार गजानन लव्हटे यांना उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
गजानन लव्हटे १९९७ पासून गेली २९ वर्षे दैनिक तरुण भारत संवाद कोल्हापूरकडे सांगरूळ बातमीदार म्हणून काम करत आहेत .
कुस्ती क्षेत्रातील विविध समस्या तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या कुस्ती मैदानांची प्रसिद्धी तरुण भारत च्या माध्यमातून त्यांनी सातत्याने केली आहे . डोपिंग मुक्त कुस्ती अभियान ,कोरोना काळातील बंद पडलेली कुस्ती मैदाने सुरू व्हावी याबाबत दैनिक तरुण भारत मधून आवाज उठवला आहे .खासबाग कुस्ती मैदानाची दुरावस्था यासह पैलवानांचे मानधन ग्रामीण भागातील तालमींची दुरावस्था या तालमींना निधी मिळावा यासाठी तरुण भारत च्या माध्यमातून वारंवार आवाज उठवला आहे .तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या कुस्ती मैदानांची दैनिक तरुण भारत च्या माध्यमातून उत्कृष्ट प्रसिद्धी देऊन पैलवानांना व कुस्ती मैदान संयोजकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे . त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र कुस्ती संघटनेने त्यांना उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले . यावेळी महाराष्ट्र केसरी समाधान घोडके उपमहाराष्ट्र केसरी संभाजीराव पाटील पै संग्राम कांबळे यांचे सह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .