Monday, November 23, 2026
HomeCrimeकेडीसीसी बँकेचा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! म्हशींसह गाईंच्या खरेदीसाठीही मिळणार कर्ज

केडीसीसी बँकेचा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! म्हशींसह गाईंच्या खरेदीसाठीही मिळणार कर्ज

कोल्हापूर, दि. २३ : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळात निर्माण होणारी दूधटंचाई लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे दुधाळ म्हशींबरोबरच दुधाळ गाईंच्या खरेदीसाठीही बँकेकडून अर्थपुरवठा केला जाणार आहे. गोकुळ आणि वारणा दूध संघांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत बँकेच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

केडीसीसी बँकेने यापूर्वी परराज्यातून दुधाळ म्हशी खरेदी करण्यासाठी तसेच विविध शासकीय आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांमधून कर्जपुरवठा करण्यासाठी धवलक्रांती योजना सुरू केली होती. दूध संघांच्या विनंतीनुसार या योजनेत केवळ म्हशी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीत ताज्या दुधाची गरज वाढणार असल्याने म्हशींबरोबरच दुधाळ गाईंच्या खरेदीसाठीही अर्थपुरवठा करावा, अशी मागणी गोकुळ आणि वारणा दूध संघांनी केली होती. त्यानुसार कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

७५ टक्के म्हशी, तर २५ टक्के गाईंसाठी अर्थपुरवठा

केडीसीसी बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, महात्मा जोतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांसह धवलक्रांती योजनेतूनही कर्जपुरवठा केला जातो. या योजनांमध्ये १५ लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठ्याची मर्यादा आहे.

या कर्जपुरवठ्यातील ७५ टक्के रक्कम म्हशींच्या खरेदीसाठी, तर २५ टक्के रक्कम गाईंच्या खरेदीसाठी वापरता येणार आहे. दोन जनावरे खरेदीच्या धवलक्रांती योजनेत आता एक म्हैस आणि एक गाय खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

गुजरात, हरियाणातून म्हशी; संकरित गाईंच्या खरेदीलाही परवानगी

एनडीडीबीची गडहिंग्लज आणि केर्ली येथे दोन केंद्रे आहेत. या केंद्रांच्या माध्यमातूनही जनावरांची खरेदी करता येणार आहे. याशिवाय गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध मुरा जातीच्या तसेच हरियाणातील जिंद जिल्ह्यातील म्हशींच्या खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

बेंगळुरू आणि अन्य ठिकाणांहून संकरित दुधाळ गाईंची खरेदी करण्यासाठीही परवानगी दिली जाणार आहे. मात्र, गोकुळ आणि वारणा दूध संघांच्या तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या ठिकाणांहूनच या गाईंची खरेदी करण्याचे धोरण राहणार आहे. या गाईंसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे.

अनुदान १० हजारांवरून २० हजार रुपये होणार?

दुधाळ म्हशी आणि गाईंच्या खरेदीसाठी सध्या केडीसीसी बँकेकडून दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान वाढवून वीस हजार रुपये करण्याचा विचार बँकेच्या स्तरावर सुरू आहे. दूध संघांकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानातही वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.

मात्र, अनुदान वाढल्यास बाजारात जनावरांच्या किमती वाढण्याची शक्यता काही संचालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वाढीव अनुदान देण्याऐवजी जनावरांच्या खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज द्यावे का, याचाही विचार सुरू आहे. यासाठी गोकुळ आणि वारणा दूध संघांच्या तज्ज्ञ समित्या नेमण्यात येणार असून, शेतकऱ्यांना कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरेल, याबाबत त्या अहवाल सादर करणार आहेत.

शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार

जनावरांच्या खरेदीसाठी वाढीव अनुदान द्यायचे की बिनव्याजी अर्थपुरवठा करायचा, याचा अंतिम निर्णय तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना ज्या पर्यायातून अधिक फायदा होईल, त्याची अंमलबजावणी करण्याची भूमिका केडीसीसी बँकेने घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या जनावरांची पाहणी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी गोकुळ व वारणा दूध संघांवर राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular