Friday, October 16, 2026
HomeCrimeखुपिरे येथील फार्महाऊसवर करवीर पोलिसांचा छापा; अश्लील गाण्यांवर नृत्य सुरू असल्याचा...

खुपिरे येथील फार्महाऊसवर करवीर पोलिसांचा छापा; अश्लील गाण्यांवर नृत्य सुरू असल्याचा प्रकार उघड,बंद खोलीत मद्यधुंद अवस्थेत आढळले तीन तरुण आणि एक महिला

 

दोनवडे, प्रतिनिधी : करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुपिरे येथील वरपे फार्महाऊसवर करवीर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. फार्महाऊसमधील एका बंद खोलीत तीन तरुण आणि एक महिला मद्यधुंद अवस्थेत, मोठ्या आवाजात लावलेल्या अश्लील गाण्यांवर कथितपणे अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे पोलिसांना आढळले. या प्रकरणी संबंधितांना ताब्यात घेण्यात आले असून, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक फार्महाऊस आहेत. खुपिरे येथील वरपे फार्महाऊसवर एका महिलेला बोलावून घेण्यात आले असून, तेथे बेकायदेशीररीत्या मद्यपान करून मोठ्या आवाजात गाणी लावली जात असल्याने सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक कळमकर यांनी पोलीस पथकाला संबंधित फार्महाऊसवर जाऊन खातरजमा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्यासह पोलिसांच्या पथकाने वरपे फार्महाऊसवर धाड टाकली.

बंद खोलीत सुरू होता प्रकार

पोलिसांनी फार्महाऊसची तपासणी केली असता, एका बंद खोलीत तीन पुरुष आणि एक महिला मद्यधुंद व अर्धनग्न अवस्थेत आढळून आले. संबंधित व्यक्ती अश्लील गाण्यांवर अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पवन पुंडलिक पवार (वय २६, रा. दोनवडे, ता. करवीर), सौरभ राजाराम कळके (वय २७, रा. दोनवडे, ता. करवीर) आणि श्रीधर बबन वरपे (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) या तिघांची नावे समोर आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित फार्महाऊस श्रीधर वरपे यांच्या वडिलांचे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात संबंधित महिलेसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. महिलेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस हवालदार रणजित पाटील, पोलीस अंमलदार प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण आणि महिला पोलीस अंमलदार प्रज्ञा पाटील यांचा समावेश होता.

दरम्यान, फार्महाऊसवर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular