Sunday, November 1, 2026
HomeEducationई-वेस्ट रिसायकलिंग वॉरियर स्पर्धेत मनपा जरग विद्यामंदिरची बाजी जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक; पावणेदोन...

ई-वेस्ट रिसायकलिंग वॉरियर स्पर्धेत मनपा जरग विद्यामंदिरची बाजी जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक; पावणेदोन टन ई-कचऱ्याचे संकलन करून कार्बन उत्सर्जन रोखले

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी मोहन कांबळे):
पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशन आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने, दैनिक ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात आयोजित ‘ई-वेस्ट रिसायकलिंग वॉरियर कॉन्टेस्ट २०२६’ या स्पर्धेत मनपाच्या श्रीम. लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिर (जरगनगर) शाळेने द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश देत शाळेने या मोहिमेत तब्बल १,७९६ किलो (पावणेदोन टन) ई-कचरा संकलित केला. या संकलनाद्वारे शाळेला जवळपास चार ते पाच हजार किलो कार्बन उत्सर्जन रोखण्यात यश आले आहे. निव्वळ कचरा संकलनाचा विचार करता शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर होती; परंतु अंतिम निकाल ‘एकूण संकलन भागिले विद्यार्थी संख्या’ या सूत्रानुसार लावण्यात आल्याने शाळेला द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. हे संकलित केलेले ई-कचरा रिसायकलिंगसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द करण्यात आले.
गौरव आणि पारितोषिकाचे स्वरूप
शाळेला मान्यवरांच्या हस्ते रु. ९,०००/- रोख पारितोषिक, भव्य सन्मानचिन्ह, मानपत्र आणि ‘ग्रीन स्कूल सर्टिफिकेट’ देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच शाळेतील टॉप थ्री ठरलेल्या खालील विद्यार्थ्यांना पदके, प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले:
* प्रथम: अभेद्या अग्निमित्र कुलकर्णी (इयत्ता ३ री)
* द्वितीय: शर्विल वैजनाथ पवार (इयत्ता १ ली)
* तृतीय: देवश्री सचिन जाधव (इयत्ता ३ री)
मान्यवरांच्या हस्ते सत्कार
हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूरच्या अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा दरेकर, डॉ. माधवी पटवर्धन, दैनिक ‘सकाळ’चे संपादक मा. निखिल पंडितराव, सौ. वासंती लेले, तसेच रोटरी व इनरव्हील क्लबचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सामूहिक प्रयत्नांचे फळ
हे यश मुख्याध्यापिका मा. नीता ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्याध्यापक श्री. शिवाजी पाटील यांच्या सहकार्याने आणि प्रकल्प समन्वयक शिक्षिका सौ. सुवर्णा सोनाळकर यांच्या नियोजनाखाली मिळाले. या मोहिमेत श्री. सुभाष मराठे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. तसेच पृथ्वी झिरो वेस्ट फाउंडेशनचे सहसंस्थापक श्री. हिमांशु लेले व त्यांच्या टीमचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच ‘जरगनगर सेनेने’ हे अभिमानास्पद यश मिळवले असून संपूर्ण परिसरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular