गोकुळ अध्यक्षपदाचा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला कायदेशीर पेचप्रसंग अखेर संपुष्टात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि महायुतीला मोठा दणका देत कोल्हापूर सर्किट बेंचने १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, निवडणूक आयोगाने नियमानुसार सात दिवसांची नोटीस देऊन ही निवडणूक पार पाडावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
काय आहे पार्श्वभूमी?
गोकुळची निवडणूक १८ ऑक्टोबर रोजी पार पडली होती आणि १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत २५ पैकी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला १३ जागा तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत.
यानंतर २९ ऑक्टोबर रोजी अध्यक्ष निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला महायुतीच्या संचालकांनी पोटनियमांचा दाखला देत दांडी मारली होती. गोकुळच्या नियमावलीनुसार सभेसाठी १४ संचालकांची गणपूर्ती (कोरम) आवश्यक असते. गणपूर्ती न झाल्यामुळे ही पहिली बैठक तहकूब करावी लागली होती. मात्र, त्यानंतर समविचारी आघाडीने समांतर सभा घेऊन शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली होती. यावरून मोठा कायदेशीर व राजकीय वाद निर्माण झाला होता.
सत्तास्थापनेसाठी महायुतीच्या राजकीय हालचाली
सतेज पाटील यांच्या आघाडीला कोणत्याही परिस्थितीत अध्यक्षपद मिळू नये यासाठी महायुतीकडून मुंबईपासून कोल्हापूरपर्यंत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू होत्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १६ ऑक्टोबर रोजीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मागच्या दाराने शासन आणि तज्ज्ञ नियुक्त संचालकांची संख्या वाढवण्याची विनंती केली होती. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महायुती स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन आपला चेअरमन बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले होते.
न्यायालयाच्या निर्णयामुळे महायुतीला दणका
गोकुळच्या पोटनियमानुसार सलग तीन बैठकांना संचालक अनुपस्थित राहिल्यास त्यांचे संचालकपद आपोआप रद्द होते. या सर्व राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्किट बेंचने दिलेल्या या निर्णयामुळे महायुतीच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले असून आता १० नोव्हेंबरला होणाऱ्या प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.