कोल्हापूर :
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती, डिजिटल सुरक्षेविषयी जागरूकता आणि सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी सक्षम मनुष्यबळ निर्मितीसाठी ‘नॅशनल सायबर रिसोर्स सेंटर’ प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास नॅशनल सायबर सिक्युरिटी रिसर्च कौन्सिल (एनसीएसआरसी), नवी दिल्लीचे संचालक डॉ. खलीराज ई. यांनी व्यक्त केला. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे एनसीआरसी सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. सायबर सुरक्षेचे ज्ञान केवळ विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न ठेवता ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
डॉ. खलीराज ई. यांनी केंद्राच्या विकासाची संकल्पना आणि भविष्यातील कार्याची दिशा स्पष्ट केली. सायबर सुरक्षा क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाला चालना देण्यासोबतच शैक्षणिक संस्था आणि समाज यांच्यात समन्वय साधून सायबर सुरक्षेचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविण्याचे काम या सेंटरमार्फत होईल असे त्यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी विविध सायबर गुन्ह्यांची उदाहरणे देत ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. सायबर सुरक्षेचे व्यावहारिक ज्ञान देण्यासोबतच शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर सायबर क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक संजय हरुगले यांनी सायबर हल्ल्यांचे धोके, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
उदघाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे झाली. एचडीएफसी पेन्शनचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी रवींद्र पिंगळे यांनी ‘डिजिटल युगातील सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. नीयामोचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी सचिन कावळकर यांनी ‘सायबर सुरक्षा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी आणि आवश्यक कौशल्यांची माहिती दिली. तसेच कोहेसिटी इन्क. (पूर्वीचे व्हेरिटास टेक्नॉलॉजी) येथील सिक्युरिटी आर्किटेक्ट जयंत दुसाने यांनी ‘सायबर सुरक्षेचे भविष्य’ या विषयावर आधुनिक सुरक्षा प्रणाली आणि भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, सीएचआरओ श्रीलेखा साटम, महाविद्यालयाचे डेप्युटी रजिस्ट्रार अश्विन देसाई यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. ग्रंथेज ओतारी यांनी आभार मानले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज एस. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज एस. पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.