कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या अध्यक्ष निवडीचा मार्ग न्यायालयाने मोकळा केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. येत्या १० नोव्हेंबर रोजी ही निवडप्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या निकालानंतर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती; मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच राजकीय डावपेचांना सुरुवात झाली.
बहुमताच्या जोरावर शौमिका महाडिक किंवा अरुण डोंगळे-चुयेकर गटच अध्यक्षपदाची धुरा सांभाळेल, असे वाटत होते. परंतु, महायुतीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चार स्वीकृत संचालक (सदस्य) नियुक्त करण्याची विनंती केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज (मंगळवारी) होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळून या स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची दाट शक्यता आहे. जर तसे झाले, तर गोकुळवर महायुतीचा अध्यक्ष बसण्याची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे आजचा दिवस गोकुळच्या सत्ताकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे.
दुसऱ्या बाजूला, न्यायालयाने निवडणुकीचा निर्णय देताच दोन्ही गटांकडून संचालकांची पळवापळवी आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार सतेज पाटील यांच्या गटाने यासाठी तगडी फिल्डिंग लावली असून, विरोधी गटातील एक संचालक त्यांच्या गळाला लागल्याची माहिती समोर येत आहे.
आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत चुयेकर बाजी मारणार, महायुती स्वीकृत सदस्यांच्या जोरावर गेम बदलणार, की सतेज पाटलांची रणनीती यशस्वी ठरणार? गोकुळच्या राजकारणाचा हा थरार नेमका कोणत्या थराला जातो, याचे स्पष्ट चित्र आज मंगळवारी होणाऱ्या घडामोडींनंतर स्पष्ट होईल.