Monday, November 9, 2026
HomePoliticalगोकुळच्या शासननियुक्त संचालकांविरोधात कोल्हापुरात संघर्षाचा एल्गार; सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो दूध...

गोकुळच्या शासननियुक्त संचालकांविरोधात कोल्हापुरात संघर्षाचा एल्गार; सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो दूध उत्पादक रस्त्यावर! २० फुटी कोल्हापुरी पायतान ठरले मोर्चाचे आकर्षण; गायी-म्हशींसह शेतकऱ्यांचा सहभाग, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : गोकुळ दूध संघावर शासनाच्या अध्यादेशाद्वारे पाच सदस्यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात आता रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (९ नोव्हेंबर) कोल्हापुरात संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चासाठी दसरा चौकात हजारो दूध उत्पादक शेतकरी एकवटले आहेत. गायी, म्हशी आणि पारंपरिक शेतीची अवजारे घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी झाल्याने आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे.

दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या मोर्चात शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी लक्षवेधी बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘कोल्हापुरी बाणा… सत्तेसाठी रडीचा डाव खेळणाऱ्यांना पायतान हाणा..!’, ‘सहकाराच्या जोरावर लोकशाही संपवता येत नाही’, ‘गोकुळवर राजकीय सावट नको’, तसेच ‘लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा मजकुरातून सरकारच्या निर्णयावर निशाणा साधण्यात आला आहे.

या मोर्चाचे सर्वाधिक लक्षवेधी आकर्षण म्हणजे तब्बल २० फूट उंचीचे भव्य कोल्हापुरी पायतान! सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरी बाण्याचे प्रतीक म्हणून हे पायतान मोर्चात आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एका म्हशीच्या गळ्यात ‘मला पण स्वीकृत संचालक म्हणून घ्या’ असा फलक लावण्यात आला आहे. ‘गोकुळ आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी दसरा चौक परिसर दणाणून गेला आहे. हातात नांगर घेऊन एक शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

गोकुळच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी दिलेला कौल बाजूला ठेवून शासनाने अध्यादेशाद्वारे पाच सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने गोकुळच्या सत्तासमीकरणात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे सहकारातील लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

याबाबत भूमिका मांडताना आमदार सतेज पाटील यांनी, कोल्हापूरच्या जनतेने दिलेला मतदानाचा कौल बाजूला सारण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई सुरूच आहे; मात्र आता लोकशाही आणि दूध उत्पादकांच्या हक्कासाठी रस्त्यावरची लढाईही लढावी लागणार आहे, असे सांगत दूध उत्पादकांना संघर्ष मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे.

दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरील आंदोलनाचीही धार मिळाल्याने या संघर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular