Monday, November 9, 2026
HomePoliticalगोकुळच्या संघर्ष मोर्चात बॅनरबाजीचा राजकीय बॉम्बगोळा! ‘विधानसभेसाठी काय काय केलं असेल?’ ...

गोकुळच्या संघर्ष मोर्चात बॅनरबाजीचा राजकीय बॉम्बगोळा! ‘विधानसभेसाठी काय काय केलं असेल?’ ‘लक्षात ठेवलंय २०२९… हे कोल्हापूर हाय!’ म्हणत विरोधकांवर निशाणा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात निघालेल्या संघर्ष मोर्चात केवळ शक्तिप्रदर्शनच नव्हे, तर बॅनरबाजीच्या माध्यमातूनही राजकीय संघर्षाची धार पाहायला मिळत आहे. दसरा चौकात लावण्यात आलेले लक्षवेधी बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरले असून, त्यातून भाजप आणि राज्य सरकारच्या निर्णयावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दसरा चौकात अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारो दूध उत्पादक शेतकरी, गायी-म्हशी आणि प्रतीकात्मक २० फूट उंचीचे कोल्हापुरी पायतान यामुळे मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र, या आंदोलनातील बॅनरबाजीने राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

‘विधानसभेसाठी काय काय केलं असेल?’

‘आम्ही हातकणंगलेकर’ या नावाने लावण्यात आलेल्या बॅनरने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘लक्षात ठेवलंय २०२९… हे कोल्हापूर हाय!’ असा इशारा देत या बॅनरवरून गोकुळच्या सत्तासंघर्षाचा संदर्भ थेट आगामी विधानसभा राजकारणाशी जोडण्यात आला आहे.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीचे २५ संचालक निवडून आले नसते, तर भाजपला २६ स्वीकृत संचालक घेऊन बहुमताचे गणित जुळवावे लागले असते, असा उपरोधिक टोला या बॅनरमधून लगावण्यात आला आहे. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणारे विधानसभा निवडणुकीसाठी काय काय करत असतील, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. ‘ही संघर्षाची शेवटची दिवाळी असू दे, हे कोल्हापूर हाय!’ असा मजकूरही या बॅनरवर झळकत आहे.

अटलजींच्या राजीनाम्याचा दाखला देत सरकारला सवाल

आणखी एका बॅनरने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. ‘एक खासदार कमी होता म्हणून राजीनामा देणारे अटलजी कुठे? आणि एक संचालक कमी आहे म्हणून चार संचालक नियुक्त करणारे कुठे?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाची तुलना इंग्रजांच्या राजवटीशी करत, ‘गोकुळचा निर्णय बघितला आणि वाटलं इंग्रज आणि यांच्यात फरक काय राहिला? भारत स्वतंत्र करण्याची वेळ आलीये?’ अशा उपरोधिक शब्दांत सरकारवर टीका करण्यात आली आहे.

बॅनरबाजीने मोर्चाला राजकीय रंग

‘इडा-पिडा टळू दे’ अशा आशयाचे बॅनरही दसरा चौकात झळकत आहेत. कोल्हापुरी पायतान, शेतकऱ्यांचा संताप, सरकारविरोधातील घोषणा आणि आक्रमक बॅनरबाजी यामुळे संघर्ष मोर्चाला वेगळेच राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

गोकुळमधील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय आता केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणातही उमटू लागले आहेत. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीचा उल्लेख करत झळकलेल्या बॅनर्समुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाचे राजकीय पडसाद आगामी काळातही उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे दसरा चौकातील संघर्ष मोर्चा आंदोलनासोबतच राजकीय संदेश देणारा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular