कळे : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १८) कळे परिसरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी कळे येथे आंदोलनात सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट क व गट ड), महाराष्ट्र राज्य बेलिफ महासंघ आणि महाराष्ट्र राज्य स्टेनोग्राफर असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. कळे न्यायालयातील कोल्हापूर येथील कर्मचारी कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत, तर कळे परिसरातील कर्मचाऱ्यांनी कळे येथे आंदोलनाला पाठिंबा देत काम बंद ठेवले.सहायक अधीक्षक, लिपीक, बेलीफ आणि शिपाई कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला आहे.
सुधारित वेतनश्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हा बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.