उत्तूर, दि. २१:
आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत गोरगरीब जनतेनेच मला तारले. यापुढील आयुष्यातही गोरगरिबांच्या आशीर्वादामुळेच माझी ही नौका पैलतीराला लागेल, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
उत्तूर ता. आजरा येथे निराधारांना पेन्शन योजना मंजुरीपत्रे व एस. टी. स्मार्ट कार्ड वाटप, अशा संयुक्त कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, १९८०-८१ साली संजय गांधी निराधार योजना सुरू झाली. गोरगरिबांसाठी ही योजना अतिशय चांगली आहेच. दरम्यान; यामधील अटी मात्र अडचणीच्या होत्या. १९९९ साली विशेष सहाय्य खाते माझ्याकडे आले आणि या योजनेमध्ये अमुलाग्र बदल केला. या योजनेतील सर्व कडक अटी शिथिल केल्या आणि ही योजना खऱ्या अर्थाने निराधारांची, गोरगरिबांची आणि दिव्यांगांची केली. या योजनेतील २१ हजारांची उत्पन्न मर्यादा ५० हजार करावी, ६५ वर्षांवरील वयोमर्यादा ६० वर्षांवर आणावी, दरमहा १,५०० असलेली पेन्शन दरमहा २,००० करणे यासाठी माझे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
*भविष्यातही तरुन जाईन……!*
श्री. मुश्रीफ म्हणाले, गोरगरीब जनतेचे फार मोठे ऋण माझ्यावर आहेत. त्यामुळेच गेली ३० वर्षे या विधानसभा मतदारसंघाचा आमदारपदी व त्यापैकी २५ वर्षे मंत्रिपदावर राहू शकलो. आजवरच्या आयुष्यात अनेक चांगले-वाईट प्रसंग आले. अनेक लढाया आणि संघर्ष करण्याचेही प्रसंग आले. गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळामुळेच या सगळ्यातून तरलो आहे. भविष्यातही गोरगरीब जनतेच्या आशीर्वादावरच मी तरून जाईन आणि यशस्वी होईन.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऊस दरावर यशस्वी तोडगा काढल्याबद्दल पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हस्ते मंत्री हसन मुश्रीफ यांचा ऊसमोळी देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, दीपक देसाई, मारुतराव घोरपडे, विकास चोथे, नायब तहसीलदार विकास कोलते, संतोष सांगडे, उत्तम रेडेकर, एम. के. देसाई, गणपतराव सांगले, संजय गाडे, राजू मुरुकटे, गंगाधर हराळे, मेजर भोसले, रामदास आजगेकर, अनिकेत कवळेकर, संजय येजरे, तानाजी पाटील, शंकर पाटील, आनंदा घाटगे, सदाशिव पाटील, बबनराव पाटील, अंबाजी गुरव, शशिकांत लोखंडे, संभाजी तांबेकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांचेही भाषण झाले.
स्वागत आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुनील दिवटे यांनी केले. प्रास्ताविक तहसीलदार समीर माने यांनी केले. आभार माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली यांनी मानले.

