Sunday, November 22, 2026
HomePoliticalश्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना अपघात; १८ वर्षीय अनुदीपची मृत्यूशी झुंज अपयशी, कळे गावावर...

श्राद्धाच्या कार्यक्रमाला जाताना अपघात; १८ वर्षीय अनुदीपची मृत्यूशी झुंज अपयशी, कळे गावावर शोककळा

कुडित्रे, ता. 22 : मित्राच्या मामाच्या गावाला श्राद्धाच्या कार्यक्रमासाठी जायचे म्हणून दोघे तरुण सकाळी दुचाकीवरून घराबाहेर पडले. सोबत गप्पा, मनात कार्यक्रमाला पोहोचण्याची ओढ आणि नेहमीप्रमाणे सुरू झालेला प्रवास… मात्र, काही क्षणांतच या प्रवासाला भीषण अपघाताचे गालबोट लागले. कोपार्डे (ता. करवीर) येथे शुक्रवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनुदीप गणेश सुतार (वय १८, रा. कळे, ता. पन्हाळा) याची आज दुपारी उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. ज्या कार्यक्रमासाठी तो मित्रासोबत निघाला होता, तिथे पोहोचण्याऐवजी त्याचा प्रवास रुग्णालयात संपला. या घटनेने कळे गावावर शोककळा पसरली आहे.

प्रथमेश बाजीराव पाटील (वय २४) आणि अनुदीप हे दोघे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास दुचाकीवरून कोपार्डे येथील मामा सागर पाटील यांच्या घरी निघाले होते. कोपार्डे येथील ओढ्याच्या पूर्वेकडील मोठ्या उतारावरून गगनबावड्याच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रेलरची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता एवढी मोठी होती की, दोघेही रस्त्यावर दूरवर फेकले गेले. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची अवस्था चिंताजनक बनली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत दोघांनाही तातडीने कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. अनुदीपची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा बाळगून होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. उपचार सुरू असतानाच त्याची मृत्यूशी झुंज संपली. अवघ्या १८ वर्षांच्या अनुदीपच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाने घराबाहेर पडलेला तरुण पुन्हा घरी परतलाच नाही, ही जाणीव नातेवाइकांसह गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारी ठरली. अपघाताची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular