पुणे (मोहन कांबळे ): “गाथा भारतीय निवडणुकांची “ या डॉ.विजय चोरमारे जेष्ठ पत्रकार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील पत्रकार भवन येथे संपन्न झाला. भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजअखेर देशात झालेल्या निवडणुका व त्यांच्या कार्यपध्दतीची उत्कृष्ट मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.
आज देशभरात निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या संदर्भानं जो काही गोंधळ, गदारोळ चाललाय, अशा काळात हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका अत्यंत गरजेच्या असतात. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशामध्ये अशा निवडणुका घेणं हे मोठं आव्हान होतं. परंतु पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी हे आव्हान पेललं. आणि भारतासारख्या देशातील निवडणुका यशस्वी करून दाखवल्या.
त्यांच्या या कामामुळं संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडं वेधलं गेलं. आणि त्यानंतर जगातल्या इतरही काही देशांनी सुकुमार सेन यांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शनासाठी निमंत्रित केलं. याचाच अर्थ सुकुमार सेन यांनी देशातच नव्हे तर जगभरात लोकशाही प्रस्थापित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
आजच्या परिस्थितीत मागं वळून बघताना फार मोठा विरोधाभास दिसून येतो. कुठं जगाला निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणारे सुकुमार सेन आणि कुठं भारतातली निवडणूक व्यवस्था उद्ध्वस्त करणारे ज्ञानेश कुमार, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.
सत्ताधा-यांनी आपल्या सोयीनुसार निवडणूक आयोगाचा कधीमधी वापर करून घेतला. परंतु टी. एन. शेषन यांच्यासारख्या कणखऱ निवडणूक आयुक्तांनी इथल्या निवडणुकांना शिस्त लावली. आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. आणि इथल्या सर्वसामान्य जनतेचा निवडणुकीवरील म्हणजेच लोकशाहीवरील विश्वास वाढीस लावला.
निवडणूक आचारसंहिता राजकीय पक्षांना, नेत्यांना जाचक वाटत असली तरी सामान्य मतदारांनी मात्र नेहमीच तिचे स्वागत केले आहे. आणि अलीकडच्या काळात निवडणूक आयोगच जेव्हा आचारसंहितेला बगल देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सामान्य नागरिकांना लोकशाहीबद्दल चिंता वाटायला लागते. अलीकडं ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात लाखो लोक रस्त्यावर आले, त्यातून ते जगाला कळले. लोकांच्या विशेषतः जेन झीच्या या जागरुकतेमुळं या देशातील लोकशाहीला कुणी धक्का पोहोचवू शकत नाही, हा विश्वा मिळाला.
पहिली निवडणूक पाहिल्यानंतर एका परदेशी अभ्यासकांनी नोंदवलंय की, भारतातील निवडणुकांनी उच्च-नीच भेद संपवून टाकले आहेत. कारण सगळे एका रांगेत मतदानासाठी उभे आहेत. करोडपती, उच्च जातीचा, अत्यंत सामान्य माणूस तसेच अत्यंत फाटका माणूस असे सगळे एका रांगेत उभे राहिल्याचं अविस्मरणीय चित्र या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळालं. असं या अभ्यासकांनी नोंदवलंय. यावरून भारतातील निवडणुकांनी केवळ लोकशाहीच रुजवली नाही, तर काही काळासाठी का असेना विषमतेवरही प्रहार केल्याचं आपल्याला दिसून येतं
विजय चोरमारे यांनी या पुस्तकात १९५२च्या पहिल्या निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीपर्यंतचा आढावा घेतला आहे. एकेक निवडणूक कशी पार पडली, कोणते पक्ष होते, त्यांची चिन्हं काय होती, कुणाला किती मतं मिळाली अशी सगळी माहिती यात आहेच. परंतु त्यापलीकडं अनेक नाट्यमय, रंजक घटना आहेत. त्यामुळं हे पुस्तक वाचनीय बनलं आहे.
आपल्याकडं निवडणुकीच्या काळात अनेक ऐतिहासिक घटना घडल्यात. बाळासाहेब विखे-पाटील विरुद्ध यशवंतराव गडाख यांच्यातली निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. कोर्टानं ती निवडणूक रद्द केली होती. त्यात नेमकं कायकाय घडलं होतं, आणि कोर्टानं कोणत्या गोष्टींना गैरप्रकार मानलं होतं, हे समजून घेतलं तर आजच्या काळातही मार्गदर्शक ठरणार आहे.
पंडित नेहरूंची पहिली निवडणूक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुका, इंदिरा गांधींचे झालेले दोन पराभव, शऱद पवार साहेबांची पहिली निवडणूक अशी अनेक इंटरेस्टिंग प्रकरणं पुस्तकात आहेत.
भारतीय लोकशाहीचा प्रवास समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचायला हवं. केंद्रीय निवडणूक आयोगाची वाटचालही वाचायला मिळते. आयोगाचा लौकिक कसाकसा ढासळत गेला, हे पाहायला मिळतं. आयोगानं कसं काम करायला पाहिजे हेही कळतं.
या कार्यक्रमास माहिती तंत्रज्ञान व विज्ञान मंत्री ना. आशिष शेलार , लेखक डॉ.विजय चोरमारे ,राष्ट्रीय कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे , पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे,माजी खासदार शेतकरी नेते राजु शेट्टी यांचेसह मान्यवर उपस्थित होते.