कोल्हापूर : राज्यातील रिक्षाचालकांचा बंद, महामंडळांची सद्यस्थिती, कोल्हापूर महापौर निवड, दुष्काळग्रस्तांना मदत आणि शक्तिपीठ महामार्ग अशा विविध मुद्द्यांवरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विविध मागण्या केल्या.
रिक्षाचालकांच्या बंदला काँग्रेसचा पाठिंबाराज्यातील रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदच्या मागण्या रास्त असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सतेज पाटील यांनी जाहीर केले. राज्यात सुमारे १५ लाख रिक्षाचालक असून प्रत्येकाने दररोज चार लिटर पेट्रोल भरले तरी सरकारला मोठ्या प्रमाणात व्हॅट मिळतो. मात्र, याच रिक्षाचालकांच्या उपजीविकेवर सरकारच्या धोरणांचा परिणाम होत आहे. रिक्षाचालकांचे संसार यावर अवलंबून असताना सरकार त्यांचे कंबरडे मोडत आहे. मग या १५ लाख रिक्षाचालकांना सरकार नोकऱ्या देणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रिक्षा महामंडळ स्थापन होऊनही चालकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. महायुती सरकारने जाहीर केलेली १२५ महामंडळेही केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप त्यांनी केला.
महापौर निवडीत सत्ताधाऱ्यांमध्येच संभ्रम!कोल्हापूर महापौर निवडीवर भाष्य करताना सतेज पाटील यांनी अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या कार्यकाळाचे समर्थन केले. कायद्याच्या तरतुदीनुसार अडीच वर्षांचा महापौर केल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आमच्या काळावर बोट दाखवले जाईल; मात्र आता सत्ताधाऱ्यांमध्ये जशी भांडणे सुरू आहेत, तशी आमच्या काळात नव्हती. भाजपनंतर शिवसेनेला महापौरपद मिळणार की राष्ट्रवादीला, हेच अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
ओबीसी दाखला सादर केल्यानंतर जात पडताळणीसाठी एक वर्षाची मुदत देण्याच्या नियमावरही त्यांनी आक्षेप घेतला. वर्षभर महापौरपद उपभोगल्यानंतर जात पडताळणीत दाखला रद्द झाला तरी चालणार का, असा सवाल करत सरकारच्या कार्यपद्धतीवर त्यांनी टीका केली.
दुष्काळ जाहीर करण्यातही राजकारण?दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सतेज पाटील यांनी सरकारच्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. जून-जुलैच्या पावसाळ्यातच पहिला ट्रिगर लागू करायला हवा होता; मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेतही राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
“सत्तेतील आमदाराच्या मतदारसंघातील तीनपैकी दोन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करायचे आणि एक तालुका वगळायचा, असे राजकारण सुरू आहे. दुष्काळ आहे की नाही यापेक्षा निधीप्रमाणे दुष्काळाचे वाटप सुरू आहे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” अशी टीका त्यांनी केली.
गडहिंग्लजमध्ये सर्वपक्षीय आंदोलनानंतर सरकारने निर्णयाच्या दिशेने पावले उचलली. आता आम्ही आंदोलन केल्यावरच सरकार जागे होणार का? असा सवाल करत करवीर आणि कागल हे तालुके तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.
शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोधशक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरही सतेज पाटील यांनी सरकारला लक्ष्य केले. महामार्गासाठी मोजणी करण्यास येणाऱ्या यंत्रणेला शेतकऱ्यांचा विरोध असताना पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
“मोजणी करायला कोण येते, ते आणि शेतकरी पाहून घेतील. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
रिक्षाचालकांचे प्रश्न, महापौर निवडीतील राजकीय संघर्ष, दुष्काळी मदतीतील कथित भेदभाव आणि शक्तिपीठ महामार्गाचा विरोध या मुद्द्यांवरून सतेज पाटील यांनी महायुती सरकारला एकाच वेळी घेरले. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा रंगली आहे.