Thursday, April 16, 2026
HomePoliticalपन्हाळा : ग्रामीण रुग्णालयातील प्रकारानंतर नगरपरिषदेत आढावा बैठक

पन्हाळा : ग्रामीण रुग्णालयातील प्रकारानंतर नगरपरिषदेत आढावा बैठक

पन्हाळा प्रतिनिधी – शहाबाज मुजावर

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा नगरपरिषदेच्या वतीने मंगळवारी (दि. ७ एप्रिल २०२६) सायंकाळी आढावा बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षा जयश्री पवार (तोरसे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या मागणीनुसार तातडीने प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत संध्याकाळी सहानंतरही डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध राहावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच रुग्णालयासाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी वास्तव्यास राहावे, असेही सांगण्यात आले. या निवासस्थानांमध्ये काही अडचणी असल्यास त्या आरोग्यमंत्री स्तरापर्यंत पाठपुरावा करून सोडवू, असे आश्वासन नगरपरिषद सदस्यांनी दिले.

दरम्यान, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांची दुरवस्था मांडली. पाण्याची कमतरता असून अनेक घरे पावसाळ्यात गळती होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर नगरपरिषद प्रशासनाला तातडीने मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अवघ्या दोन वर्षांत निवासस्थाने खराब कशी झाली याची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक मिलिंद कुराडे यांनी केली.

याशिवाय, १०८ रुग्णवाहिकेचे लोकेशन वाघबिळ घाट परिसरात ठेवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, ज्यामुळे पन्हाळगड व आसपासच्या भागात आपत्कालीन सेवा जलद मिळू शकतील. आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे आणि रुग्णांशी सुसंवाद व योग्य वागणूक ठेवण्याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

या बैठकीस नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्यासह नगरसेवक मिलिंद कुराडे, लक्ष्मण कांबळे, शहाबाज मुजावर तसेच नगरसेविका प्रगती गवंडी, प्रतीक्षा वराळे, समीना गारदी, रशिदा मुजावर, शबाना मुल्ला, प्रियांका गवळी उपस्थित होते. याशिवाय मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता प्रिया तारळेकर, कार्यालयीन अधीक्षक श्वेता कुंडले यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील अभिवंत आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, या बैठकीतून ग्रामीण रुग्णालयातील सुविधा तातडीने सुधारण्यावर भर देण्यात आला असून प्रशासनावर ठोस कारवाईचा दबाव वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular