पन्हाळा प्रतिनिधी – शहाबाज मुजावर
पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावातील एका तरुणाची लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आज त्यांना रिमांडसाठी पन्हाळा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
फिर्यादी तरुण हा गोलिवडे गावातील भैरवनाथ मंदिराचा पुजारी असून त्याचे लग्न ठरत नसल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी त्याला जाळ्यात ओढले. आरोपी हे त्याचेच मित्र असल्याने त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. आरोपींनी एका बोगस मुलीचा फोटो पाठवून ती लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले.
यानंतर विविध कारणे सांगून आरोपींनी फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने पैसे उकळले. मुलीला वडील नसल्याने तिच्या चुलत्या व भाऊजीला पैसे द्यावे लागतील, अन्यथा तिचे लग्न दुसरीकडे ठरवले जाईल, असे सांगून पैसे घेतले. तसेच मुलीच्या मामाला पैशांची गरज असल्याचे सांगूनही रक्कम उकळण्यात आली.
याशिवाय मुलीचे दागिने पॉलिश करण्यासाठी १५ हजार रुपये, तसेच लग्नाचा बस्ता काढण्यासाठी कापड दुकानातून खरेदी करून त्याचेही पैसे फिर्यादीकडून घेतले. एवढेच नव्हे तर नरसोबाची वाडी येथे नारायण नागबळी शांती करण्यासाठी ८ हजार रुपये घेतल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, मुलीची आजी वारल्याचे कारण देत लग्न ३ मेपर्यंत पुढे ढकलण्यात आले. १ मे रोजी फिर्यादीने लग्नासाठी जेवणाचा किराणा, वऱ्हाडासाठी वाहन आदी सर्व तयारी केली होती. मात्र, २ मे रोजी अचानक मुलगी लग्नाला तयार नसल्याचे सांगून आरोपींनी आणखी एक महिना थांबण्यास सांगितले.
यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.