शिर्डी, दि. ९ एप्रिल (प्रतिनिधी) – बेकायदेशीर सावकारी आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलिस कोठडी मिळावी, यासाठी शिर्डी पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेली कल्पना खरात हिने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, या अर्जावर १० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी केली आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर येत असून, शिर्डीतील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत अंधभक्तांच्या नावाने बनावट खाती उघडण्यात आल्याचा संशय आहे. या खात्यांमध्ये वारसदार म्हणून अशोक खरातचे नाव आणि मोबाईल क्रमांक देण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकारात शेकडो भक्त अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर एका राजकीय पक्षाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकांचीही बनावट खाती आढळल्याची माहिती पुढे आली असून, संबंधितांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सध्या शिर्डी पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.