Wednesday, April 15, 2026
HomeCrimeअवघ्या १५ हजारांच्या कथित लाच प्रकरणाने खळबळ; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

अवघ्या १५ हजारांच्या कथित लाच प्रकरणाने खळबळ; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

अकोला : जिल्ह्यातील गौण खनिज व्यवसायाशी संबंधित कथित लाच प्रकरणामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. प्रमोद गायकवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अकोला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वाद अधिक चिघळला आहे.

खाण व क्रशर व्यवसायिकांकडून खाणींचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास कारवाईची धमकी दिल्याचाही दावा संबंधित व्यावसायिकांनी केला आहे.

या प्रकरणी खाण व क्रशर संघटनेचे अध्यक्ष विवेक बिजवे यांनी MIDC पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२), ३५१(१) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामध्ये पैशांच्या व्यवहारासंदर्भातील संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या ऑडिओची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “माझ्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून, मी कोणाकडूनही पैशांची मागणी केलेली नाही. महसूल वाढीसाठी आणि रॉयल्टी वसुलीसाठीच बैठका घेतल्या होत्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सुमारे ७० गौण खनिज खाणी कार्यरत असून, त्यासंदर्भातील परवाने, रॉयल्टी व महसूल वसुलीची जबाबदारी प्रशासनाकडे आहे. चालू आर्थिक वर्षात १३० कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र मार्चअखेरपर्यंत अपेक्षित वसुली झाली नसल्याचेही समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पोलिस तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular