पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. हुगळी जिल्ह्यातील गोघाट परिसरात तृणमूल काँग्रेस (TMC) नेते सहदेव बाग यांचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नकुंडा पंचायत अंतर्गत कोटा गावाजवळील TMC पक्ष कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यात रविवारी सकाळी सहदेव बाग यांचा मृतदेह आढळला. स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.
सहदेव बाग हे गेल्या एक दिवसापासून बेपत्ता होते. त्यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ते स्थानिक पंचायत सदस्य चीनाबाग यांचे पती होते.
या घटनेनंतर सहदेव बाग यांच्या पत्नीने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सहदेव यांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. शनिवारी रात्री ते घराबाहेर गेले होते, मात्र त्यानंतर ते परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून स्थानिकांची चौकशी सुरू आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
याचदरम्यान, पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील खेजुरी भागातही जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजप समर्थकांवर ६० हून अधिक दुकाने जाळल्याचा आरोप केला आहे. राज्यातील वाढत्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.