कोल्हापूर, प्रतिनिधी : करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरीत्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई करत तब्बल १३ लाख ६९ हजार ५७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४ लाख ५९ हजार ५७५ रुपयांची देशी-विदेशी दारू तसेच दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुन्हे शोध पथकाला अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.
पहिली कारवाई : चारचाकीतून विदेशी मद्य वाहतूक
दिनांक १ जून २०२६ रोजी गुन्हे शोध पथकातील कर्मचारी विजय पाटील व सोमराज पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळंबा परिसरात सापळा रचण्यात आला. कळंबा नाक्याजवळ हॉटेल रानवारा समोर निस्सान कंपनीची टेरॅनो (एमएच-१० बीआर-९७९७) ही गाडी अडविण्यात आली.
तपासणीदरम्यान गाडीतून ३१ हजार ७०० रुपयांची विदेशी दारू आढळून आली. वाहनासह एकूण ७ लाख ३१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहाजी साताप्पा बरगे (वय ४८, रा. अर्जुनवाड, ता. राधानगरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई : टेंपोमधून देशी-विदेशी मद्य जप्त
दरम्यान, गुन्हे शोध पथकातील सुभाष सरवडेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नवीन वाशी नाका परिसरात सापळा रचण्यात आला. श्री लॉनसमोर टाटा कंपनीचा जीप एक्सेल टेंपो (एमएच-११ सीएच-४१५०) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये ४ लाख २७ हजार ८७५ रुपयांची देशी-विदेशी दारू आढळून आली.
या कारवाईत टेंपोसह ६ लाख ३७ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मुबीन अजीज शेख (वय २६, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, सध्या कळंबा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाईन शॉप चालकांनाही आरोपी
पोलिस तपासात जप्त करण्यात आलेली दारू गोल्डन वाईन्स (हॉकी स्टेडियम परिसर) आणि मेरवाडे वाईन्स (सायबर चौक, कोल्हापूर) येथून खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित वाईन शॉप चालकांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून त्यांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोसई नाथा गळवे, सुभाष सरवडेकर, रणजीत पाटील, विजय तळसकर, विजय पाटील, योगेश शिंदे, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील आणि श्रीधर जाधव यांनी सहभाग घेतला.
सदर प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.