Monday, June 1, 2026
HomePoliticalगोकुळ निवडणूक प्रक्रियेवरून वाद तीव्र; अवमान याचिकेच्या इशाऱ्याने खळबळ

गोकुळ निवडणूक प्रक्रियेवरून वाद तीव्र; अवमान याचिकेच्या इशाऱ्याने खळबळ

कोल्हापूर : प्रतिनिधी | दि. 01 जून 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेवरून वाद अधिकच तीव्र झाला असून निवडणूक प्रक्रिया आणि न्यायालयीन आदेशांच्या अर्थाबाबत दोन गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. श्री. महादेव सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, वडकशिवाले (ता. आजरा) येथील संचालक प्रकाश तुकाराम बेलवाडे यांनी निवडणूक कार्यालय व सहकार खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिल्याने चर्चेला उधाण आले आहे.

प्रकाश बेलवाडे यांनी दिलेल्या नोटीसमध्ये निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांनी चुकीचा सल्ला दिल्यामुळे त्या आधारे चुकीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच-कोल्हापूर यांच्या आदेशाचा अवमान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया तत्काळ थांबविण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या आरोपांना प्रत्युत्तर देताना स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, पुंगाव (ता. राधानगरी) यांच्यावतीने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात नव्हे, तर न्यायालयीन आदेशांचा चुकीचा अर्थ लावून निवडणूक प्रक्रिया लांबविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फौजदारी अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित वकिलांनी योग्य कायदेशीर सल्ला दिल्यानंतर गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, न्यायालयीन आदेशांचा विपर्यास करून न्यायालयीन व्यवस्थेचा अवमान करण्याचा प्रयत्न प्रकाश बेलवाडे व त्यांचे वकील ॲड. सतीश तळेकर यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असून त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायदेशीर प्रभाव राहत नाही, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान 90 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतची भूमिका स्पष्ट झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या न्यायालयीन वादामुळे सहकार क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular