खुपिरे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम खुपिरे येथे उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले. या दिंडीतून चिकट सापळे, प्रकाश सापळे, पक्षी थांबे, जीवामृत आणि दशपर्णी अर्क यांच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३०० गावांमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेट देत त्यांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले.
खुपिरे, शिंदेवाडी आणि साबळेवाडी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच नैसर्गिक शेती, मृदासंवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्रगतशील शेतकरी दादू ज्योतीराम जांभळे यांच्या भुईमूग प्रक्षेत्रावर हा उपक्रम राबविण्यात आला. तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी गटशेती आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. उपकृषी अधिकारी संतोष पाटील यांनी दशपर्णी अर्क व जीवामृत तयार करण्याची पद्धत आणि त्याचा योग्य वापर याविषयी माहिती दिली. तर सहाय्यक कृषी अधिकारी उर्मिला सरनाईक यांनी जीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
उपक्रमानिमित्त पीएम श्री विद्यामंदिर, खुपिरे येथे वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमास माऊली शेतकरी गटातील शेतकरी, पंचायत समिती सदस्य आशा पाटील, मोहीम अधिकारी सुशांत लवटे, उपसरपंच सागर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम महसूल अधिकारी के. पी. पोवार, पाणी फाउंडेशनच्या नम्रता खानापुरे, ओंकार सुर्वे तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक व सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती होऊन शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.