कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील नवी वाशी नाका परिसरात गुरुवारी भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञात दोघांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, गोळीबारात सूरज साखरे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सूरज साखरे यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, खासगी सावकारकीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप या कारणाला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
या घटनेमुळे नवी वाशी नाका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.