कोल्हापूर/दोनवडे : श्रीकांत पाटील
गोकुळ निवडणुकीसंदर्भात आयोजित महायुतीच्या बैठकीला चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलवलं नसल्याने आ. शिवाजी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला मानसन्मान नसेल तर आ. सतेज पाटील आमचे लांबचे नाहीत असे वक्तव्य त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महायुतीतील नेतेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर नाराज आहेत. सतेज पाटील मात्र या नाराजांवर डोळा ठेवून आहेत. सतेज पाटील व शिवाजी पाटील एकत्र आले तर गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू समविचारी आघाडीला ताकद मिळणार आहे. हे दोन पाटील एकत्र येतात काय याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
आ. शिवाजी पाटील यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सतेज पाटील यांनी म्हंटले आहे. महायुतीतील नेत्यांनी आ. शिवाजी पाटील बोलावून चर्चा करावी ते सुद्धा महायुतीचे एक घटक आहेत त्यांच्याशी संवाद साधून गोकुळसंदर्भात असलेले समज-गैरसमज दूर करावेत पण असा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केलेला नाही. आजरा, गडहिंग्लज, चंदगड या तीन तालुक्यांचा गोकुळ दूध संकलनात सिंहाचा वाटा आहे. चंदगडमधून म्हैशीचे दूध मोठ्या प्रमाणात गोकुळला येते. मागील निवडणुकीत अंतर्गत कलह यामुळेच राजेश पाटील यांच्यासह तिघांचा पराभव झाला. अंजना रेडेकर या एकट्याच निवडून आल्या. या भागातून नेतृत्व असलं पाहिजे अशी भूमिका त्यांची आहे हे चुकीचे नाही असेही सतेज पाटील यांनी म्हंटले आहे.
जिल्ह्याची अर्थवाहिनी व प्रमुख सत्ताकेंद्र असणाऱ्या गोकुळवर आपलेच प्राबल्य असावे यासाठी महायुती व राजर्षी समविचारी आघाडी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी असा सामना होण्याची चिन्हे आहेत. खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक या दिग्गजांची फौज महायुतीकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या नेत्यांना एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. आमदार सतेज पाटील हे पक्षनिरपेक्ष समविचारी आघाडीच्या माध्यमातून उभे ठाकले आहेत.
आम्ही राजर्षी शाहू समविचारीआघाडी म्हणून समोर आलो आहे. जे येतील त्यांना बरोबर घेऊन जायचं अशी आमची भूमिका आहे. सतेज पाटील यांच्या या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.