Friday, June 12, 2026
HomeCrimeमंदिरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक; तीन गुन्हे उघडकीस

मंदिरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक; तीन गुन्हे उघडकीस

कोल्हापूर, दि. १२ जून : राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातील चांदीच्या गणपतीच्या मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या चांदीच्या मूर्तींसह दोन मोटारसायकली असा एकूण २ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० जून २०२६ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान कसबा तारळे (ता. राधानगरी) येथील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या गाभाऱ्याचा लोखंडी दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. मंदिरातील संगमरवरी मूर्तीसमोर ठेवलेल्या चांदीच्या दोन गणपती मूर्ती चोरून नेण्यात आल्या. याप्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८५/२०२६ अन्वये भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (ड) व ३३१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी पथकासह घटनास्थळी भेट देत सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली.

दरम्यान, पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संदीप जांभळे व मंगेश कुराडे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. दोघेजण चोरीतील चांदीच्या मूर्तींसह कळंबा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर १२ जून रोजी साळोखे नगर ते शिवप्रभुनगर रोडवर सापळा रचण्यात आला.

या कारवाईत संदीप आनंदा जांभळे (वय ३५, सध्या रा. बापुरावनगर, कोल्हापूर) आणि मंगेश भिकाजी कुराडे (वय ३९, रा. कळंबा, करवीर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३४५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन गणपती मूर्ती, हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक MH-09-FR-0534 व MH-09-DG-1295 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आले असून, जप्त करण्यात आलेल्या दोन्ही मोटारसायकली या शाहूपुरी व राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यांतील असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल (भा.पो.से.) व अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular