पन्हाळा | प्रतिनिधी (शहाबाज मुजावर):
पन्हाळगडावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून नगरपरिषद हद्दीतील तब्बल पाच ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेक घरांचे, वाहनांचे तसेच वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे.
महालक्ष्मी रिसॉर्ट परिसरात पुन्हा एकदा मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. तसेच एका पर्यटकाच्या कारवर झाड पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. याशिवाय प्रकाश गवंडी यांच्या वाहनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामुळे सादोबा दर्गा परिसरातील शेड उडून गेले, तर गडावरील अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आणि किरकोळ पडझड झाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज खांब वाकले असून वीजतारा जमिनीवर आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या २४ तासांपासून गडावरील वीजपुरवठा खंडित झाला होता.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा बंद करून कोसळलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेतले. वाकलेले वीज खांब सुरक्षितपणे हटवून पर्यायी व्यवस्था करण्यात आली.
पन्हाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वास रामाणे, जयश्री देवकुळे, जयवंत कांबळे तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता ऋषिकेश खांबे, वायरमन अमर सनगर, राम जगताप, बळीराम जाधव, ओंकार फडके आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत व दुरुस्तीचे काम करून परिस्थिती नियंत्रणात आणली.