Monday, July 6, 2026
HomeCrimeशेजारी घर बंद असल्याची संधी साधून सोन्यावर मारला डल्ला; २.२० लाखांचा मुद्देमाल...

शेजारी घर बंद असल्याची संधी साधून सोन्यावर मारला डल्ला; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी ताब्यात

कोल्हापूर, दि. ६ : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे शेजारी घरात कोणी नसल्याची संधी साधून घरफोडी करून सोन्याची तीन पदरी माळ व रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवघ्या काही दिवसांत अटक केली. आरोपीकडून सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरनोबतवाडी येथील रेणुका मंदिराजवळील एका घरात २६ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत घरातील व्यक्ती बाहेर असताना अज्ञात चोरट्याने दरवाजा उघडून प्रवेश केला. घरातील ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची तीन पदरी माळ आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गांधीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून साक्षीदारांची चौकशी तसेच गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील व प्रदीप पाटील यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार यश संतोष जाधव (वय २०, रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) हा संशयित सरनोबतवाडी टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ६ जुलै रोजी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ३२ ग्रॅम वजनाची सोन्याची तीन पदरी माळ व रोख रक्कम असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी (करवीर) आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच वैभव पाटील, प्रदीप पाटील, संतोष बरगे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, गजानन गुरव, विशाल खराडे, परशराम गजरे आणि अमित मर्दाने यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular