Sunday, July 12, 2026
HomeCrimeकुंभी नदीत वाहून गेलेल्या जनार्दन शिंदे यांचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

कुंभी नदीत वाहून गेलेल्या जनार्दन शिंदे यांचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला

पन्हाळा, दि. १२ (प्रतिनिधी): कुंभी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या जनार्दन शिंदे यांचा मृतदेह आज (दि. १२) सकाळी तांदुळवाडी (ता. पन्हाळा) परिसरातील नदीपात्रात आढळून आला. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, कळे पोलीस प्रशासन आणि ‘व्हाईट आर्मी’च्या जवानांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत होती.

मुसळधार पावसामुळे कुंभी नदीला मोठा पूर आला होता. वेतवडे धरणाजवळ जनार्दन शिंदे हे पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले होते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. मात्र अथक प्रयत्नांनंतर चौथ्या दिवशी त्यांचा मृतदेह लोंघे (ता. गगनबावडा) हद्दीतील तांदुळवाडी परिसरातील नदीपात्रात आढळून आला.

व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन भोसले, शैलेश रावण, श्रीकांत पाटील आणि शंकर केंगारे यांच्या पथकाने सातत्याने शोधकार्य सुरू ठेवत अखेर मृतदेह शोधून काढला.

घटनेची माहिती मिळताच कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चार दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेचा अखेर दु:खद शेवट झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular